लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून उपयुक्त व हानिकारक कीड तसेच रोग व्यवस्थापनावर गटचर्चा
फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे स्थानिक पिकांवरील उपयुक्त व हानिकारक कीड तसेच प्रमुख रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर गटचर्चा व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी भात, नाचणी, ऊस, आंबा व काजू या पिकांवरील प्रमुख किडी व रोग, त्यांची ओळख, लक्षणे व नुकसान याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच उपयुक्त कीटकांचे महत्त्व व संवर्धन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘पॉवरपॉइंट’ सादरीकरणाद्वारे विषय चित्रांसह सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आला.
कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक रोग व्यवस्थापन यावर विशेष भर देत सांस्कृतिक, यांत्रिक, जैविक तसेच गरजेनुसार रासायनिक नियंत्रण पद्धतींची माहिती देण्यात आली. रासायनिक कीटकनाशकांचा अवाढव्य वापर टाळून शिफारशीनुसारच वापर करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन डॉ. एस. एन. काळे, डॉ. पी. डी. पोटफोडे तसेच कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये वेदांत घाग, स्वयंभू प्रभुदेसाई, प्रतीक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर, करण बन्ने, आदित्य प्रभुदेसाई, रीशल मस्केरेन्हस व आशिम कुमार महंती यांनी सहभाग घेतला.











