दूध संस्थांमध्ये रंगणार ‘आदर्श’ स्पर्धा

जिल्हा बँकेचा उपक्रम; प्रथम क्रमांकाला ५० हजारांचे बक्षीस, एक लाख लिटर दूध संकलनाचे लक्ष्य

ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दूध उत्पादनाला चालना देतानाच दूध सहकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन, आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभाराला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्कृष्ट संस्थेला ५० हजार, द्वितीय क्रमांकाला ३० हजार आणि तृतीय क्रमांकाला २० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, सध्या प्रतिदिन २८ हजार लिटर असलेले जिल्ह्यातील दूध संकलन पुढील पाच वर्षांत एक लाख लिटर प्रतिदिन करण्याचे उद्दिष्ट बँकेने निश्चित केले असल्याची माहिती अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. २०१२ पासून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात दूध संकलन सुरू झाले. सुरुवातीला अवघे ५०० लिटर प्रतिदिन असलेले दूध संकलन आता २८ हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे. सध्या जिल्ह्यातील १२१ गावांमधील १४१ संस्थांमार्फत दूध संकलन केले जात आहे.

पुढील पाच वर्षांत जिल्ह्यातील दूध उत्पादन आणि संकलन प्रतिदिन एक लाख लिटरपर्यंत नेण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे. त्यादृष्टीने दूध उत्पादक शेतकरी आणि सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

error: Content is protected !!