स्वातंत्र्यदिनी रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, सुरक्षित रहावेत– फोंडाघाटवासीयांचा संताप !

निखिल कन्स्ट्रक्शन ला आणि किती बळी/ अपघात हवेत ?– आक्रोश.

तातडीने कार्यवाहीची अपेक्षा, अन्यथा आंदोलनाचा इशारा !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सध्या सह्याद्री पट्ट्यात संततधार- मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे आणि गटार कामाच्या हलगर्जीपणामुळे देवगड– घाट खिंडीपर्यंतच्या राज्य महामार्गाची, खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. सध्या हा रस्ता निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केला जात आहे. घाटातील रस्ता- गटाराचे काम प्रगतीपथावर असूनही, कामाच्या दर्जाबद्दल ग्रामस्थ निकृष्ट असल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत ..

घाटातील रस्ता तसेच घाट पायथ्यापासून नांदगाव तिथ्यापर्यंत च्या रस्त्यावर खोल खड्ड्यांचे साम्राज्य असून, रस्त्याची चाळण झाली आहे. आणि रस्त्यातील दगड- खडी बाहेर आली आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार महिन्यात चार-पाच गंभीर अपघात होऊन, दोघांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यातच मध्यंतरी पाऊस दहा-बारा दिवस नसताना, ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे रात्री एक वाजता, पाऊस पडत असताना, खड्ड्यामध्ये काँक्रीट टाकून, वर प्लास्टिक कापड टाकले गेले. त्यामुळे काँक्रीट वाहून गेले आणि पांढरे कापड खड्ड्यावर पसरल्याने ठेकेदारांनी ‘खड्ड्याची अंत्ययात्रा काढली’ असा तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे

येत्या स्वातंत्र्य दिवसापूर्वी, निखिल कन्स्ट्रक्शन- ठेकेदारांनी सदर रस्त्यावरील सर्व खड्डे तातडीने कायमस्वरूपी भरून फोंडावासीयांना खड्डेमुक्त,अपघात मुक्त आणि सुरक्षित मार्ग करावेत अशी आग्रही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा यापुढे अपघात झाल्यास, त्याची सर्व जबाबदारी ठेकेदारावर,संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील. तसेच अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल. असा इशारा नागरिकांकडून देण्यात येत आहे…

त्यातच ए.पी. कन्स्ट्रक्शन ने बांधलेल्या दोन्ही नवीन पुलाच्या दुतर्फा जोडावर रस्ता खचून आणि ब्रिजच्या ठिकाणी खड्डे आणि उंचवटे यामुळे सुद्धा वाहनांना त्रास होऊन अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याकडेही ठेकेदारांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी होत आहे. .

error: Content is protected !!