प्रथम क्रमांकास ५० हजार, द्वितीय ३० हजार, तृतीय २० हजारांचे बक्षीस
जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यामधील दूध उत्पादन वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत. सन २०१२ पासून गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) कोल्हापूर यांच्या मार्फत दूध संकलन सुरू झाले. सुरुवातीला ५०० लिटर दूध संकलन होत असताना ते आता २८,००० लिटर प्रतिदिन पर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यातील १२१ गावांमधील एकूण १४१ संस्था मार्फत दूध संकलन केले जाते, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मा. मनीष दळवी यांनी दिली.
पुढील पाच वर्षांत जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन प्रतिदिन एक लाख लिटर करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा
जिल्ह्यातील दूध सहकारी संस्थांमधील व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार, डिजिटल व्यवहार, दूध संकलनात वाढ, सभासद सेवा आणि बँकेच्या व शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर यांना प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था स्पर्धा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
अध्यक्ष दळवी म्हणाले, “या स्पर्धेमुळे दूध सहकारी संस्थांमध्ये निरोगी स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव होईल तसेच इतर संस्थांना आदर्श कामकाज करण्यास प्रेरणा मिळेल. यामुळे बँकेची दूध सहकारी संस्थांच्या सभासदांची बँकिंग सेवा वृद्धिंगत होण्यास मदत होईल.”
बक्षिसांची रचना
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल.
- प्रथम क्रमांक : रु. ५०,०००/-
- द्वितीय क्रमांक : रु. ३०,०००/-
- तृतीय क्रमांक : रु. २०,०००/-
ही तीन बक्षिसे सलग तीन वर्षे देण्यात येणार असून, बक्षिसे संस्थेच्या गरजेनुसार वस्तुरूप / साहित्य स्वरूपात देण्यात येतील.












