सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या आईचाच गळा आवळून खून केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी सुरेंद्र उर्फ बंड्या मोहन कदम ( वय 40 वर्षे, रा. कसाल बौद्धवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला.सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सुनावणीवेळी यशस्वी युक्तिवाद केला. बाजारात जाण्यास निघालेली स्वतःची आई मनोरंजना मोहन कदम ( वय 58 ,रा कसाल बौद्धवाडी ) हिचा आरोपी सुरेंद्र कदम ह्याने दोरीने गळा आवळून खून केला होता. ही घटना 14 ऑक्टोबर 2024 रोजी कसाल बौद्धवाडी येथे सायंकाळी साडेसात च्या सुमारास घडली होती.याबाबत आरोपी सुरेंद्र वर बिएनएस कलम 103 ( 1 ) नुसार गुन्हा दाखल करून त्याला 15 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सुरेंद्र कदम याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपी सुरेंद्र याच्या जामीन अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी सुरेंद्र याने स्वतःच्या आईचा दोरीने गळा आवळून खून करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे, या गुन्ह्याचा अद्याप तपास सुरू आहे, गुन्ह्यातील साक्षीदार आणि आरोपी हे एकाच वाडीतील असून तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, साक्षीदारांना प्रलोभन देऊन साक्ष देण्यापासून फितवू शकतो, न्यायालयीन सुनावणी वेळी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे आदी बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायालयाने आरोपी सुरेंद्र कदम याचा जामीन अर्ज नामंजूर केला.











