कर्नाटक मलपी ट्रॉलर्सची घुसखोरी थांबविण्यासाठी समुद्री गस्त वाढविण्याची केली मागणी
ओरोस (प्रतिनिधी) : हिवाळी अधिवेशनात कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांनी मच्छीमारांच्या प्रश्नावर आक्रमक होत कर्नाटक राज्यातून होणाऱ्या अतिक्रमणावर लगाम घालण्याची मागणी केली. यावर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गेली अनेक वर्षे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न असलेला मलपी बोटींच्या आक्रमणाचा प्रश्न आज सभागृहात आ राणे यांनी उपस्थित केला. बाजूच्या कर्नाटक राज्यातून येणारे ट्रॉलर्स कश्याप्रकारे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक मच्छीमारांना त्रास देत आहेत ? याची माहिती सभागृहात देत परराज्यातील ट्रॉलर्सच्या बंदोबस्तासाठी समुद्रातील गस्त वाढविण्यासोबत मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण गंभीर प्रश्न मांडला असून त्याची दखल देत त्या ट्रॉलर्सवर योग्य कारवाई करणार असल्याची ग्वाही दिली.












