मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅबिनेट मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार
कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या प्रमुख / शिखर आणि नोंदणीकृत संस्थेमार्फत अखिल भारतीय भजन संमेलनाचे आयोजन १८ आणि १९ जानेवारी २०२५ करण्यात आले आहे. या भजन संमेलनासाठी उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण राज्याचे कॅबिनेट मंत्री नाम. नितेश राणे यांची भेट घेऊन नागपूर येथे देण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रण देण्यात आले.
नागपूर येथे अधिवेशन दरम्यान अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे यांच्यासह बुवा संतोष कानडे, राजा दळवी, जयवंत राऊळ, श्री. लब्दे ,श्री. सावंत, वागणे सरपंच संदीप सावंत, दारुम सरपंच राजेंद्र तळेकर यांनी नामदार नितेश राणे यांची भेट घेत हे निमंत्रण दिले.
अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळतर्फे मागील ३५ वर्षात अनेक छोटे मोठे उपक्रम राबवण्यात आले. यंदा मात्र पहिल्यांदाच देशपातळीवरील सर्व भजनी मेळ्यांना एकत्र गुंफण्यासाठी कोकणातल्या या भजन संस्थेमार्फत अखिल भारतीय भजन संमेलनाचे नियोजन १८ आणि १९ जानेवारी २०२५ असा सलग दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करीत आहोत.
कार्यक्रमात शोभायात्रा, भजनस्पर्धा, परिसंवाद, प्रहसन, जीवन गौरव पुरस्कार, गायन, सोलो वादन, मान्यवरांचे स्वागत, असे कार्यक्रम होणार आहेत. दादर माटुंगा कल्चरल सेंटर या नाट्यगृहात हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे.












