भजन कलेला लोककला म्हणून शासन मान्यता मिळावी; नाम. नितेश राणे यांचे वेधले लक्ष
कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय भजन संमेलन २०२५ साठी भरीव आर्थिक सहाय्य करण्यात यावे तसेच सदर कार्यक्रम सरकारी अनुदानाच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या प्रमुख / शिखर आणि नोंदणीकृत संस्थेमार्फत कॅबिनेट मंत्री नामदार नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली. भजनी कलाकारांना भजन ही कला लोककला म्हणून शासन मान्यता मिळावी अशी मागणी करण्यात आली.
नागपूर येथे अधिवेशन दरम्यान अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळचे अध्यक्ष बुवा भगवान लोकरे यांच्यासह बुवा संतोष कानडे, राजा दळवी, जयवंत राऊळ, श्री. लब्दे ,श्री. सावंत, वागदे सरपंच संदीप सावंत, दारुम सरपंच राजेंद्र तळेकर यांनी नामदार नितेश राणे यांची भेट घेत हे निमंत्रण दिले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर उपस्थित होते.
अखंड भारतवर्षात अनेक संमेलने पार पडत असतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात अखिल भारतीय नाट्य संम्मेलन, साहित्य संमेलन इत्यादी सरकारी अनुदानाच्या माध्यमातून पार पडत असतात. परंतु भजनासारख्या पारंपारिक संस्कारी प्रभावी माध्यमाला कुणी वाली नाही. अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ (रजि.) या प्रमुख / शिखर आणि नोंदणीकृत संस्थेमार्फत मागील ३५ वर्षात अनेक छोटे मोठे उपक्रम राबवण्यात आले. यंदा मात्र पहिल्यांदाच देशपातळीवरील सर्व भजनी मेळ्यांना एकत्र गुंफण्यासाठी कोकणातल्या या भजन संस्थेमार्फत अखिल भारतीय भजन संमेलनाचे नियोजन १८ आणि १९ जानेवारी २०२५ असा सलग दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करायचे आहे.हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार असून, अंदाजे आठ ते दहा लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. आपल्या कोकणातील भजनी कलावंत एवढा मोठा घाट घालत असताना सरकार दरबारी कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. पैशाचे सोंग घेणे संघटनेसाठी अग्नीदिव्यच आहे. तरी या उपक्रमास आपण आर्थिक पाठबळ देऊन हा कार्यक्रम दरवर्षी सरकारी अनुदानाच्या माध्यमातून मंजूर व्हावा जेणेकरून हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि सुशोभित करता येईल आणि पारंपारिक संस्कारी भजन संस्कृती जोपासण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.












