शालेय विद्यार्थ्यांच्या ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका राज्यात द्वितीय

सर्वांच्या सांघिक कामामुळे यश : गटशिक्षणाधिकारी संजय माने

मालवण (प्रतिनिधी) : ‘एक देश एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘अपार आयडी’ नोंदणीत मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल तर राज्यात द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. दरम्यान, मालवण तालुका शिक्षण विभागातील सर्वांच्या एकत्रित सांघिक कामगिरीचे हे यश असल्याचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार देशाच्या एकूण शैक्षणिक धोरणात महत्वपूर्ण बदल होत असताना ‘अपार’ हा त्यापैकीच एक कार्यान्वित झालेला उपक्रम आहे. याद्वारे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डीजीलॉकर उपलब्ध असणार आहे. त्यालाच ऑटोमोटेड पर्मनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री असे म्हणतात.

गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी यां निमित्ताने सांगितले,
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार देशाच्या एकूणच शैक्षणिक धोरणामध्ये आमुलाग्र बदल करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रशासनाकडून राज्यातील प्रत्येक विदयार्थ्यांना ‘अपार’ आयडी तयार करून घेण्याच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. अपार आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु. डायस प्रणालीच्या विदयार्थी प्रणाली (स्टुडंट पोर्टल) मध्ये एसडीएमआयएस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार मालवण तालुक्यातील शालेय विदयार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे काम सुरु असून तालुक्यात एकूण 10 हजार 585 विदयार्थी असून 10 हजार 239 विदयार्थ्यांचे अपार आयडी जनरेट करुन जिल्हयात प्रथम क्रमांक तर संपूर्ण राज्यात मालवण तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालवण तालुक्याचे एकूण 96.79% विदयार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे.

विदयार्थ्यांचे अपार आयडी तयार करताना अनेक तांत्रिक अडचणी भेडसावत होत्या. त्यामध्ये विदयार्थ्यांचे आधार कार्ड मधील चुका असल्यामुळे अपार आयडी नोंदणी प्रामुख्याने समस्या निर्माण झाल्या होत्या तसेच अपार आयडी जनरेट करण्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक होते. त्याकरिता सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या वारंवार बैठका घेऊन समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच विदयार्थ्यांच्या आधार कार्ड दुरुस्तीबाबत तालुकास्तरावर विदयार्थ्यांच्या आधार दुरुस्तीसाठी विशेष शिबीर (कॅम्प) आयोजित करण्यात आले होते. आणि तालुक्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना 9 व 10 डिसेंबर 2024 रोजी प्रत्येक शाळेत ‘मेगा अपार दिवस’ साजरा करण्यासाठी सर्व मुख्याध्यापकांना सुचना देण्यात आल्या होत्या. त्यासार सदर दिवशी अपार आयडी बनवण्यासाठी सर्व शाळांमध्ये विस्तृत स्वरूपात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. तसेच उर्वरित विदयार्थ्यांच्या अपार आयडी नोंदणीसाठी येत्या काही दिवसात तालुकास्तरावर विदयार्थ्यांसाठी आधार दुरुस्ती शिबीराचे आयोजन करुन शंभर टक्के अपार आयडी नोंदणीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.

सदरचे ऑनलाईन कामासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा संगणक प्रोग्रामर, तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटसाधन केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी, तंत्रस्नेही शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सांघिक योगदानामुळेच हे शक्य झाले. तसेच मालवण तालुका इतर ऑनलाईन कामामध्ये सुद्धा अपार आयडी नोंदणी, महावाचन लेखन अपलोड करणे, परीक्षा पे चर्चा, संविधान दिनाचे फोटो अपलोड करणे, चॅटबॉट वर संकलित गुणांच्या नोंदी करणे इत्यादी ऑनलाईन कामामध्ये सुध्दा जिल्हयात व राज्यात अग्रेसर राहिल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. असे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सांगितले.

error: Content is protected !!