अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून मदतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती

जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि बदनापूरचे आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

यावर्षी अपुऱ्या पावसामुळे सोमाठणा तलावातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मत्स्यउत्पादनावरही त्याचा गंभीर परिणाम झाला असून, गेल्यावर्षीच्या ७९ टक्के मत्स्यउत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन केवळ २० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशा सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून, शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांनाही शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तलावातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहितीही यावेळी मच्छीमार बांधवांना देण्यात आली. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेऊन उपलब्ध शासकीय योजनांचा उपयोग करून घेण्याचे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.

यावेळी मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहाय्यक आयुक्त (भूजल) ऋता दीक्षित, प्रादेशिक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव यांच्यासह मत्स्यव्यवसाय व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!