वैभववाडी सहकारी संघाकडून उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव

वार्षिक सर्वसाधारण सभेत सहा पुरस्कारांचे वितरण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वतीने तालुक्यातील शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा दरवर्षीप्रमाणे गौरव करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध पिकांचे उत्पादन घेऊन आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट भात पीक शेतकरी म्हणून लोर येथील शांताराम बाबाजी कदम, काजू पीक शेतकरी म्हणून सांगुळवाडी येथील प्रफुल बळीराम रावराणे, तर ऊस पीक उत्पादक शेतकरी म्हणून सोनाळी येथील अरविंद भास्कर रावराणे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणून नानिवडे येथील शरदचंद्र नारायण नानिवडेकर, पशुपालक शेतकरी म्हणून उंबर्डे येथील सदानंद शांताराम दळवी, तर भरडधान्य (नाचणी) उत्पादनासाठी जांभवडे येथील कृषी दर्पण शेतकरी बचत गटाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष प्रमोद पुंडलिक रावराणे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!