दोन दिवस पोलीस कोठडी
सावंतवाडी (प्रतिनिधी) : १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून ६१ वर्षीय किराणा दुकानदार असलेल्या वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मे महिन्यानंतर दोन वेगवेगळ्या प्रसंगी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी बांदा पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,मे महिन्यात पीडित अल्पवयीन मुलगी काही वस्तू घेण्यासाठी आरोपीच्या दुकानात गेली होती. त्यावेळी ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी तिला दुकानात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
यानंतर सुमारे पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा असाच प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनांनंतर मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. घरातील व्यक्तींनी तिला आरोपीच्या दुकाना वस्तू आणण्यासाठी जाण्यास सांगितले असता ती घाबरत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला.
माहिती मिळताच नातेवाईकांनी बांदा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलीस करत आहेत.








