पेंडूर मांड उत्सवास लोटला भाविकांचा जनसागर

विलोभनीय अशा लक्षदीप सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध

चौके (अमोल गोसावी) : महाराष्ट्र राज्यासह राज्याबाहेरही ज्या उत्सावाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेल्या पेंडूर गावच्या तब्बल १४ दिवस भरविल्या जाणाऱ्या देवीच्या मांड उत्सवानिमित्त मंगळवार दिनांक २१ रोजी रात्रौ देवस्थान ट्रस्ट कमिटी, पाच बारा मानकरी, गावकर मंडळी यांच्यावतीने मांड उत्सवाच्या १२ व्या दिवशी लक्षदिप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत विलोभनीय असा लक्षदीपोत्सव सोहळा काल संपन्न झाला.

रात्रौ ९ वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, पाच बारा मानकरी, गावकर मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून व श्री देव वेताळ चरणी शुभाशीर्वाद घेऊन लक्षदिप सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पाटेल, सचिव अमित कुळकर्णी, खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, भाऊ पटेल ,अमित पटेल, संतोष सावंत, नंदू नातू, मनोज राऊळ, आप्पा सावंत व पाच बारा मानकरी, गावकर मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर मंदिराच्या आवारात सर्वत्र भाविकांच्या हस्ते दिवे प्रज्वलित करण्यात आले. दीपोत्सवानिमित्त मंदिराच्या सभोवती गावातील युवतींनी आकर्षक भव्य अशा रांगोळ्या काढल्या होत्या. त्या रांगोळ्या भोवती लावलेले दीप मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच उजळवून टाकत होते. तसेच मंदिराच्या समोरच्या परिसरात आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. लक्षदीप सोहळ्याने संपूर्ण पेंडूर गाव लक्षदिव्यांनी उजळून निघाले होते. यानिमित्ताने संपूर्ण जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भाविकांचा जनसागर पेंडूर गावात लोटला होता. याची देही याची डोळा असा लक्षणीय ठरलेला लक्षदीप सोहळा प्रत्येक भाविक आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कॅमेराबद्ध करत होता. यानंतर रात्रौ ११ वाजता देवांच्या तरंगासह पालखी / दिंडी सोहळा पार पडला. यावेळी देवांच्या तरंगासह वेताळ देवस्थानचे तरंग सातेरी मंदिरात देवीच्या भेटीसाठी दाखल झाले तसेच यानंतर सातेरी देवस्थानचे तरंग आपल्या पालखी सह श्री देव वेताळ मंदिरात देवाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण या सोहळ्यासाठी पेंडूर गावात दाखल झाल होते त्यामुळे आजूबाजूच्या परीसरातील खाद्य दुकाने, मिठाई, ओटी सामान, कोकणी मेवा, खेळण्याची दुकाने, आईस्क्रीम पार्लर, कॉस्मेटिक या दुकानांमध्ये लोकांची खरेदीसाठीएकच गर्दी दिसून येत होती. या दिवशी समाधानकारक व्यवसाय झाल्याने व्यापाऱ्यांमधूनही समाधान व्यक्त केले जात होते. याबरोबरच देवस्थान ट्रस्ट वतीने मांड उत्सवाच्या निमित्त होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करून भाविकांना अल्प कालावधीत दर्शन मिळत असल्यामुळे भाविकांनीही उत्सव नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!