श्री देव वेताळ, देवी जुगाई, देवी सातेरी चरणी मनोभावे लीन
चौके (अमोल गोसावी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा पेंडूर गावचे सुपुत्र व विद्यमान आमदार आणि नवनिर्वाचित भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज दुपारी सपत्नीक पेंडूर येथे सुरू असलेल्या त्रैवार्षिक मांड उत्सवास हजेरी लावली. श्री देव वेताळ मंदिर येथे येत, श्री. देवी जुगाई श्री देव वेताळ चरणी नतमस्तक होत मनोभावे सेवा केली. यावेळी त्यांच्या पत्नी यांनी श्रीदेवी जुगाईची ओटी भरली तर आमदार रवींद्र चव्हाण यांनी श्रीदेव वेताळ चरणी श्रीफळ आणि भेट अर्पण केली. यानंतर श्रीदेवी सातेरी मंदिरात जात आमदार रवींद्र चव्हाण यांनी देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नीने देवी सातेरीची खणा नारळाने ओटी भरली आणि देवीचरणी मनोभावे सेवा अर्पण केली.
दरम्यान श्रीदेव वेताळ मंदिर येथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार रवींद्र चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव श्री अमित रेगे कुळकर्णी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमदार रविंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक बाबा परब, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, पेंडूर सरपंच सौ नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, साबाजी सावंत तसेच देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सुनील परब, विश्वस्त दाजी सावंत, रमेश सावंत, दिलीप परब, प्रमोद परब, नंदकुमार परब, बिपिन परब, तसेच इतर मानकरी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित इतर प्रमुख मान्यवरांचाही देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. याबरोबरच ग्रामपंचायत खरारे पेंडूर आणि सिद्धेश्वर ग्रामोन्नती मंडळ खरारे यांच्यावतीनेही आमदार रवींद्र चव्हाण यांचा भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, “अगदी लहानपणापासून देवीच्या आणि देवांच्या दर्शनाची आज नेहमी लागून राहिली आहे. प्रत्येक वेळी सहकुटुंब या मांड उत्सवासाठी मी उपस्थित असतो. पेंडूर गावातील दैवतांचे आशीर्वाद लहानपणापासून आजपर्यंत वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्याचबरोबर व्यवसायात व राजकीय जीवनात मिळत राहिल्यामुळे उत्कर्ष होत राहिला. जशी कोल्हापूरची माती पैलवान घडवते तसा पेंडूरच्या मातीमध्ये ही एक गुणधर्म आहे. राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणारी अशा विचारधारेशी एकनिष्ठ असणारी अशी माणसे घडवणारी ही पेंडूरची माती आहे. पेंडूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.










