खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील रहिवासी वसंत गोविंद चाफे (वय – ७०) यांच्या मालकीचे खारेपाटण कोंडवाडी येथे असलेले ग्रा.पं.घर नं.५२१ हे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील कपाट लॉक तोडून आतील समान अस्ताव्यस्त फेकून दिले. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक वृत असे, की मूळचे बांदिवडे ता. राजापूर जि. रत्नागिरी या गावचे रहिवासी असलेले व सद्या खारेपाटण कोंडवाडी येथे स्वतः जागा घेऊन घर बांधलेले वसंत गोविंद चाफे हे गेली ८ ते १० वर्षे खारेपाटण कोंडवाडी येथे राहत असून मुंबई गोवंडी येथे देखील ते आपल्या कुटुंबासह राहत आहेत. मात्र अधून मधून आपल्या खारेपाटण येथील गावच्या घराकडे ते येत असतात. दरम्यान आज मंगळवारी दि. २८ मार्च, २०२३ रोजी मुंबईवरून ते गावी खारेपाटणला सकाळी ७.०० वाजता आले असता त्यांच्या घराचा दरवाजा कडी कोयंडा त्यांना फोडलेला दिसला. तर आत प्रवेश केला असता घरातील कपड्यांचे कपाट फोडून आतील लॉकर तोडून आतील कागदपत्रांसह कपडे अस्तावस्त फेकून देण्यात आले होते. तर कपाटातील १००० रुपयांची सुट्टी रक्कम देखील अज्ञात चोरट्याने चोरली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच प्रेझेंट पाकिटे फाडून त्यातील देखील रक्कम चोरट्यांनी नेली असल्याचे आढळून आले.
सदर घटना लक्षात येताच वसंत चाफे यांनी तातडीने खारेपाटण पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांना आपले घर अज्ञात व्यक्तीने फोडले असल्याची माहिती दिली. तसेच श्री. चाफे यांनी खारेपाटण पोलीस स्टेशनला देखील आपले बंद घर फोडून घरात चोरी झाली असल्याबाबत लेखी तक्रार दिली असून या घटनेचा अधिक तपास खारेपाटण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उद्धव साबळे व पराग मोहिते करीत आहेत.












