आंगणेवाडी सभेत भाजपातील राणे कुटुंबाची लायकी लोकांनी पाहिली
माझे व्यवसाय माझ्या मनगटाच्या बळावर; अतुल रावराणेंचे जोरदार प्रत्युत्तर
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी माझ्यावर आरोप करणे ही गोष्ट हास्यास्पद आहे. आयकर विभागात नोकरीला असलेल्या आमदारांच्या वडिलांनी 150 कंपन्या कशा काय सुरू केल्या त्याचे गमक काय? माझे व्यवसाय हे माझ्या मनगटातील ताकदीवर उभे आहेत कोणत्याही ठेकेदाराकडून अथवा कामात कमिशन घेऊन मी व्यवसाय उभे केलेले नाहीत. ठेकेदारांकडून कमिशन घेणाऱ्या या आमदार व त्याच्या परिवारामुळेच जिल्हा विकासाला खेळ बसली असा आरोप शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केला आहे.
माझ्यावर टीका करणाऱ्या स्थानिक आमदाराने फोंडाघाट येथील ठेकेदाराकडून मुख्यमंत्री सडक योजनेतून पाच टक्के कमिशन मागितले. हे एक उदाहरण झाले अशी अनेक उदाहरणे आणि दहा वर्षाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. विकास कामांसाठी स्वतः निधी आणल्याचे हे आमदार सांगतात. मात्र निधी आणण्याची ताकद आणि कर्तुत्व यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनी आणलेल्या निधीतून कमिशन रुपी लोणी खाण्यासाठी हे फिरत आहेत. फणसे पडवणे भागातील आंबा बागायतदारांच्या भागांना आगी लागून नुकसान झाले. मला माहिती मिळताच मी तातडीने तेथे जाऊन पाहणी केली महावितरण ला याबाबत कल्पना देऊन तेथील शेतकऱ्यांना धीर दिला. तलाठ्यांना बोलावून पंचनामेच्या सूचना केल्या या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली. आपण हे करत असताना हे आमदार मात्र कमिशन साठी भूमिपूजन करत फिरत होते. तेथील शेतकऱ्यांनी याबाबत त्यांना विचारल्याने माझ्या दौरा त्यांना झोंबला व त्याच्यातूनच ते माझ्यावर टीका करत आहेत.
माझी लायकी काढताना अगोदर स्वतःची पात्रता काय ते ओळखावे. आंगणेवाडी येथील सभेत हे आमदार व त्यांच्या परिवाराची पात्रता भाजपने दाखवून दिले आहे. हे आमदार ज्या पक्षात जातील त्या पक्षाचे त्यांनी वाटोळच केलं आहे. स्वतःचा काढलेला पक्ष सहा महिन्यात वडिलांना गुंडाळा लावणार यांनी मला शिकवू नये. शिवसेनेत पक्षाची घटना आहे त्यानुसार जबाबदारी दिली जाते. पक्षाने तीन विधानसभेसाठी जे धोरण ठरवून काम करण्याचे ठरविले आहे त्याला आम्ही बांधील असू. मात्र अद्याप हे सारे निश्चित व्हायचे असून माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली असून सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणे पक्ष संघटना वाढवणे हे माझे काम आहे. शिवसेनेपूर्वी मी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काम केले. भाजपमधील लोक आजही मला सन्मानाने कार्यक्रमाला बोलवतात मानसन्मान देतात. मात्र हे त्या पक्षात जातात तिथं यांना परत कोणीच बोलवत नाही वापर करून घेऊन फेकून देणे हीच यांची कार्यपद्धती. वापर करून फेकून देऊन त्यांच्या दहा पिढ्यांचा उद्धार करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना किंमतच उरली नसल्याचे श्री.रावराणे यांनी म्हटले आहे.












