सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून नाद गर्जला – जय शिवराय !

शिव- शंभो सामा कला- क्रीडा मंडळ, फोंडाघाट आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात

भवानी चौक- कुळाची वाडी, फोंडाघाट येथे देव-देश अन धर्म तसेच संस्कार -अध्यात्माचे दर्शन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग चौथ्या वर्षी फोंडाघाट, कुळाची वाडी येथे भवानी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ठिकाणी शिव-शंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळ,फोंडाघाटच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात पंचक्रोशीतील शिवप्रेमीसह कुळाचीवाडी, पांगळेवाडी, गडगेसकल, सुतारवाडी, वाडेकरवाडी येथील अबाल वृद्ध आणि युवाई सहभागी झाली होती. सुतारवाडी शाळेतील विविध ऐतिहासिक वेशभूषेतील मुले- मुली यांनी सर्वांचे लक्ष वेधले. मुख्याध्यापक संजय सावंत आणि सहकारी शिक्षकांनी याचे आयोजन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारात, ढोल- वाद्यांच्या निनादात आणि शिवस्तुतीच्या उत्तुंग ललकारीमध्ये सकाळी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात पार पडली. स्मारक ठिकाणी शिवप्रतिमेचे पूजन करून मर्दानी खेळांचे दर्शन घडविण्यात आले. शौर्य -धाडस- निग्रह आणि आत्मविश्वास यांचे यथार्थ दर्शन बिडवाडी ग्रुपचे सहकाऱ्यांनी लाठीकाठी प्रात्यक्षिक खेळांनी दाखवून दिले. त्यानंतर श्री सत्यनारायण पूजा- आरती महाप्रसाद संपन्न झाला. सायंकाळी महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा पार पडला. स्थानिक भजन मंडळांनी आपली कलाकारी दाखवत सेवा रुजू केली. यावेळी वाडीवरील यशवंत्यांचा तसेच येणाऱ्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या पूर्वसंध्येला या पाचही वाड्यावरील सर्वांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आलेल्या तज्ञ डॉक्टर टीमने मोतीबिंदू, डोळ्यांचे- पोटाचे- मूत्राशयाचे विकार -सांधेदुखी इत्यादीचे निदान करून औषधोपचार केले.रात्री उशिरा बावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ- तेंडोली यांचा ट्रिक सीन्स ने युक्त ” कलियुगाचे इच्छित दाता- जय जय स्वामी योगराज ” हे नाटक सादर केले. याला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण दिवसभर चाललेल्या जन्मोत्सव सोहळा, मंडळाचे अध्यक्ष अशोक लाड, पदाधिकारी, सदस्य व सल्लागार यांच्या पथक परिश्रमात उत्साहात पार पडला…

error: Content is protected !!