पालकमंत्री नितेश राणेंची भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मागणीला मान्यता
पडेल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे, अंकुश ठुकरूल यांनी केली मागणी
देवगड (प्रतिनिधी) : बोरीवली गोराई च्या धर्तीवर देवगड तालुक्यातील पडेल येथील खाडी परिसरात मॅग्रोज पार्क च्या मागणीला राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्वतः मान्यता दिली असून काही काळात हे मॅग्रोज पार्क म्हणजेच कांदळवन पार्क पडेल खाडी मध्ये पर्यटकांच्या सेवेसाठी निर्माण होणार आहे. याबाबत चे निवेदन पडेल मंडल भाजपा तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना आज देवगड येथे दिले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष अंकुश ठुकरूल उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्वतः मान्यता दिल्यामुळे पडेल येथील मॅग्रोज पार्क थीम ला चालना मिळून येथील पर्यटनाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. एकीकडे सिमेंट काँक्रीटीकरण होत असलेला दुपदरी विजयदुर्ग ते कासार्डे हमरस्ता , छत्रपतींच्या आरमाराचे केंद्र असलेल्या किल्ले विजयदुर्ग येथे उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी यामुळे पर्यटकांची पावले विजयदुर्ग पडेल भागाकडे वळू लागली असतानाच मॅग्रोज प्रकल्पामुळे पडेल भागाचा पर्यटनदृष्ट्या मोठा विकास होण्यास हातभार लागणार आहे.
बोरीवली गोराई येथील समुद्रकिनारच्या खाडीपरिसरात असलेल्या मॅग्रोज पार्कमुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. पर्यटक हे मॅग्रोज पार्क पाहण्यासाठी तेथे आवर्जून भेट देतात. त्याच धर्तीवर पडेल येथे विजयदुर्ग समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या पडेल खाडी परिसरात मॅग्रोज म्हणजेच कांदळवन पार्क उभारण्यात आल्यास साहजिकच देवगड विजयदुर्ग येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पडेल खाडीत मुळातच निसर्गतः कांदळवन वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे मॅग्रोज पार्क झाल्यास पर्यटकांना कांदळवन, खेकडे मासे आदीबद्दल अधिकृत माहिती मिळेल. तसेच स्थानिकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल.










