अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार गुन्ह्यात आरोपी प्रसाद खोत चा जामीन अर्ज नामंजूर

आरोपी प्रसाद च्या जेल मुक्कामात वाढ

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी प्रसाद अशोक खोत ( वय वर्षे ४३, रा. हिंदळे ता. देवगड ) याचा जामीन अर्ज जिल्हा प्रधान न्यायाधीश यांनी नामंजूर केला. त्यामुळे आरोपी प्रसाद खोत चा जेल मुक्काम आणखी वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्रसाद खोत याने लैंगिक अत्याचार केला होता. तसेच एका विधीसंघर्षग्रस्त मुलाकडूनही पीडित युवतीवर अत्याचार घडवून आणला होता. ही घटना २०२१ ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडली होती. पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत देवगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर बी एन एस आणि पोक्सो कलमानुसार १३ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी प्रसाद खोत याला अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडी संपल्यापासून आरोपी प्रसाद हा न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन मंजूर होण्यासाठी आरोपी प्रसाद ने दाखल केलेल्या अर्जाच्या सुनावणीवेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेतली. आरोपी प्रसाद वर भांडुप आणि देवगड पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल असून तो हिस्ट्री सीटर आहे, आरोपीने बालकांविरुद्ध गंभीर गुन्हा केला आहे, आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने फिर्यादीच्या जीवितास धोका पोचवू शकेल, आरोपीला जामीन मंजूर झाल्यास पीडित फिर्यादी मुलगी आणखी मानसिक धक्क्यात जाऊन तिच्या शालेय जीवनावर परिणाम होऊ शकतो, आरोपीने याआधी अन्य बालकांबाबत असा गुन्हा केला आहे काय याबाबत पोलिस तपास सुरू आहे आदी मुद्दे न्यायालयासमोर मांडत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला हरकत घेतली. सरकारी वकील रुपेश देसाई यांच्या यशस्वी युक्तिवादानंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश यांनी आरोपी प्रसाद अशोक खोत याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

error: Content is protected !!