आंबेरी गावातील शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

अक्षय परब यांचे शैक्षणिक दातृत्व

चौके (प्रतिनिधी) : आंबेरी गावातील तिनही प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना व गावातील सर्व अंगणवाडीच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम सरपंच मनमोहन डिचोलकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव सकलेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी पार पडला. गेल्या तीन वर्षापासून आंबेरी गावचे सुपुत्र सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले अक्षय परब यांच्याकडून आंबेरी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व मुलांना व गावातील सर्व अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांना त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम विनामूल्य केला जातो. यावर्षीही इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांसाठी वह्या व शैक्षणिक साहित्य तसेच अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधून हा सामाजिक कार्यक्रम आयोजित केला जातो. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांच्या शालेय गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून सन्माननीय परब आपल्या स्वखर्चातून हा कार्यक्रम आयोजित करतात.

या कार्यक्रमावेळी आंबेरी गावचे उपसरपंच रवींद्र परब यांच्याकडून आंबेरी गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी आंबेरी नं.1 शाळेचे मुख्याध्यापक धानजी चव्हाण यांनी वरील दोन्ही दात्यांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी आंबेरी नं. 1 शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद गोसावी,आंबेरी मळा गावचे पोलीस पाटील श्री. धनंजय आंबेरकर, कल्याणी परब, भरत परब, विलास परब, भगवान परब, अक्षय परब, संजय परब, सदानंद परब, सलोनी परब, कार्तिक परब यांच्यासह गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, अंगणवाडीचे विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!