वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्निल चंद्रकांत धुरी यांनी आपला युवासेना जिल्हा चिटणीस पदाचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. राज्याप्रमाणे वैभववाडीतही उबाठा सेनेतील आऊट गोइंग सुरूच आहे. त्यामुळे उबाठाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
धुरी यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, मागील लोकसभा व विधानसभा या निवडणुकीच्या दरम्यान पक्षाचा झालेल्या पराभवानंतर पक्षाला आलेली मरगळ झटकण्यास अथवा दुर करण्यास पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी यांच्यासह सर्वच पदाधिकारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ते व पदाधिकारी हे पूर्णतः संभ्रमावस्थेत वावरत आहेत. या सगळ्याबद्दल वेळोवेळी वरीष्ठ पदाधिकारी वर्गा बरोबर चर्चा करून देखील त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका वा कार्यकर्त्यांची दखल वरीष्ठ पातळीवरून घेतली जात नाही. त्यामुळे या सर्व नैराश्यातून त्यांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्वप्नील धुरी हा उबाठा सेनेतील तरुण, अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रचार वक्ते म्हणून काम केले आहे. यापूर्वी सुद्धा त्यांनी आपल्या युवा सेना जिल्हा चिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी पक्ष नेतृत्वाने त्यांची समजूत काढली होती. मात्र आता मात्र त्यांनी आपल्या पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर उबाठा सेनेतून पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाला जयमहाराष्ट्र करीत आहेत. त्यामुळे उबाठातील आऊट गोइंग थांबता थांबेना अशी अवस्था झाली आहे.













