ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामस्थ आणि प्रशासन मधील दुवा ; संजना आग्रे
निवृत्त आणि पदोन्नती कर्मचाऱ्यांचा हृद्य सत्कार
फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रशासकीय सेवेतून निवृत्ती, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याकरिता न थांबता, ग्रामपंचायतीला कधी गरज लागेल त्यावेळी उपलब्ध राहून मार्गदर्शन करा– असे भावपूर्ण उद्घार सरपंच संजना आग्रे यांनी काढले. फोंडा ग्रामपंचायतीच्या निवृत्त कर्मचारी आणि पदोन्नती झालेल्या कर्मचारी, सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी निवृत्त कर्मचारी पांडुरंग कदम, श्यामसुंदर लाड, विजय बागवे पदोन्नती कर्मचारी यशवंत कुबल यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांनी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रवासाचे कौतुक करताना, येणारे कर्मचारी या गावचे ग्रामस्थ असल्याने अन् पुढील काळात नवनवीन आव्हाने स्वीकारताना, गावातील सर्वांशी सलोख्याने काम करण्याचे कसब अंगीकारावे,ज्यामुळे ग्रामपंचायतच्या विविध विभागातील योजना गोरगरीब – सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून कारभार समाजाभिमुख होईल असे सांगितले.
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वतीने बोलताना फोंडा नळ योजनेचे सर्वेसर्व्हा शामसुंदर लाड यांनी सेवा काळात ग्रामपंचायतीमधील वेगवेगळे सरपंच, सदस्य,अधिकारी,कर्मचारी यांचे आभार मानले. फोंडाघाटची नळ पाणीपुरवठा योजना आपल्या जिल्ह्यातील आदर्श योजना आहे. योजनेच्या प्रारंभापासून आजपर्यंत २४× ७ तास पाणीपुरवठा नियमित ठेवण्यात आम्ही कर्मचारी तत्पर राहिलो. कारण आज फोंडा विस्तृत होतंय याचे मुख्य कारण पाणीपुरवठा आहे. नवीन येणाऱ्या माझ्या कर्मचाऱ्यांनी माझ्या गावची ही योजना माझी आहे,असे काम केल्यास माझा हा सत्कार कारणी लागला असं मी मानेन. भविष्यात हाक मारा मी उपलब्ध राहीन ,असेही त्यांनी सद्गदित होऊन सांगितले.
उपसरपंच तन्वी मोदि,तंटामुक्ती अध्यक्ष सुंदर पारकर ,सदस्य पवन भोगले, अमित चव्हाण, मिलिंद लाड प्राची धुरी, प्रीतम भोगले,अवंती सावंत, सुजाता हळदीवे,शामल म्हाडगुत,विश्वनाथ जाधव ,संतोष टक्के,ध्रुव गोसावी, ग्रामसेवक मंगेश राणे,मनीषा चव्हाण, राजेश्वरी जोईल, प्रज्ञा सामंत आणि ग्रामपंचायतचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.











