करूळ घाटातून एस टी. ची दुहेरी वाहतूक सुरू ; प्रवाशांकडून समाधान व्यक्त

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटमार्गे गगनबावडा ते वैभववाडी अशी देखील वाहतूक सोमवार सकाळपासून सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी याबाबतचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. घाटातून येणारी जाणारी अशी दुहेरी वाहतूक सुरु झाल्यामुळे प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

४ मार्चपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर कडे जाणारी एकेरी एसटी वाहतूक सुरु करण्यात आली होती.तर सोमवार सकाळपासून करुळ घाटमार्गे येणारी व जाणारी वाहतूक सुरू करण्याबाबतचे आदेश एसटी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापक यांना दिले आहेत. करुळ घाटमार्गे दुहेरी एसटी सेवा पूर्ववत झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तब्बल तेरा महिन्यानंतर ही वाहतूक सुरू झाली आहे.

वैभववाडी – करुळ घाट मार्ग ते गगनवाडा रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू असल्याने करूळ घाट मार्गावरील सर्व वाहतूक २२ जानेवारी  २०२४ पासून बंद करण्यात आली होती. सदर मार्गावरून जाणारी एसटी वाहतूक फोंडा व भुईबावडा या मार्गे वळविण्यात आली होती. जिल्हाधिकारी यांनी वैभववाडी – करूळघाट मार्गे संपूर्ण एसटी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून करूळ घाट मार्गे कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या व कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या फे-या पूर्ववत झाल्या आहेत. एसटी वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशी सुखावले आहेत.

error: Content is protected !!