भिरवंडे गावाचे सुपुत्र डॉ. सुनील सावंत यांना ” काव्य गौरव पुरस्कार ” जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावाचे सुपुत्र डॉ. सुनील सावंत यांच्या साहित्य क्षेत्रातील कविता प्रांतातील उल्लेखनीय कार्याचा गौरव श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान संस्थेतर्फे ” काव्य गौरव पुरस्कार ” देऊन करण्यात येणार आहे. श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान संस्थेच्या ४१ व्या वर्धापन दिनी दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे होणाऱ्या समारंभात सदर श्री विघ्नहर्ता पुरस्कार २०२५ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

सन २००७ सालाकरिता डॉ. सुनील सावंत यांच्या मराठी पाच काव्य संग्रहांवर आधारित ” डॉ. सुनील सावंत: कवी आणि कविता ( समीक्षक : शामल वेचलेकर व बाळ राणे ) या समीक्षा ग्रंथाची निवड ‘ अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन ‘ येथे संदर्भ ग्रंथ म्हणून केली होती. त्या ग्रंथात डॉ. सुनील सावंत यांच्या ” ज्वालामुखी, माझी वस्ती मी शोधतोय, मैत्रीण, स्वातंत्र्याची हाक व सूर्य दिसत राहील तोपर्यंत…” ह्या पाच काव्य संग्रहातील कवितांची समीक्षा आहे. दरवर्षी विविध भाषेतील ग्रंथांमधून संदर्भ ग्रंथ त्या लायब्ररीत निवडले जातात. सन २००७ सालाकरिता हा आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ सुनील सावंत यांना प्राप्त झाला आहे.

डॉ. सुनील सावंत यांची मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेत एकूण २१ पुस्तके आजपर्यंत प्रकाशित असून त्यात ५ मराठी काव्य संग्रह, २ मराठी कथा संग्रह, १ मराठी अनुवादित ललित लेख संग्रह, १ मराठी आध्यात्मिक पुस्तक, ४ मराठी संपादित काव्यसंग्रह, १ मराठी संपादित चरित्रात्मक पुस्तक, त्यांच्या ५ काव्य संग्रहातील मराठी कवितांवर आधारित १ समीक्षा ग्रंथ, १ मराठी अनुवादित आध्यात्मिक ग्रंथ, १ हिंदी काव्य संग्रह, १ हिंदी आध्यात्मिक पुस्तक, १ हिंदी शोध ग्रंथ, १ इंग्लिश संपादित ललित पुस्तक व १ मराठी कादंबरीचा इंग्लिश भावानुवाद अशी पुस्तके प्रकाशित आहेत. नुकतीच नोव्हेंबर २४ मध्ये त्यांच्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत… काव्य संग्रहाची तिसरी आवृत्ती डॉ. भालचंद्र मुणगेकर ह्यांच्या हस्ते प्रसिद्ध झाली.

error: Content is protected !!