11 एप्रिलला ठोठावणार शिक्षा
शिक्षा सुनावणीची सर्वांना उत्सुकता
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी, बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत, अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी सुचवणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.
तपासातील ढिसाळपणावरही कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. या खटल्यात महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, 11 एप्रिल 2025 रोजी सर्व आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचे पती आणि मुलीला त्या दिवशी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पोलिसांवर कोर्टाचा हल्लाबोल
न्यायालयाने तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर कडाडून टीका केली. हत्या झाल्यानंतर दोन वर्षांनी शोधमोहीम, एक वर्षानंतर आरोपींचे मोबाइल ताब्यात घेणे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकरचे नाव राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणे या गंभीर चुका न्यायालयाने निदर्शनास आणल्या. “हत्या करणाऱ्या आरोपीला पदकासाठी शिफारस करणे हे अत्यंत गंभीर आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा स्पष्ट दिसतो,” असे कोर्टाने सुनावले. 11 एप्रिल 2016 रोजी घडलेल्या या हत्याकांडाचा खटला अलिबाग आणि पनवेल सत्र न्यायालयात सात वर्षे चालला, ज्यात 80 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने तपासाला गती
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले की, अभय कुरुंदकरने आपल्या पदाचा गैरवापर करत गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांनी मृतदेहाचे तुकडे करून वसईच्या खाडीत फेकले, तर राजेश पाटील हत्येनंतर घटनास्थळी उपस्थित होता, पण प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नव्हता. “उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच तपासाला खरी दिशा मिळाली,” असे घरत म्हणाले. गुन्हा 1 जानेवारी 2017 रोजी दाखल झाला, तर अभय कुरुंदकरला एक वर्षानंतर 7 डिसेंबर 2017 रोजी अटक झाली. “तत्कालीन उच्चपदस्थांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केला. याबाबत मी सर्व रेकॉर्डवर आणणार आहे,” असे त्यांनी ठणकावले.
मीरा रोडच्या घरात हत्येचा थरार
अभय कुरुंदकरने 11 एप्रिल 2016 च्या रात्री मीरा रोड येथील आपल्या घरात अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर सहकारी राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पळणीकर यांच्या मदतीने मृतदेहाचे वूड कटरने तुकडे केले. हे तुकडे काही काळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर वसईच्या खाडीत टप्प्याटप्प्याने फेकून दिले. राजू पाटीलला 10 डिसेंबर 2017 रोजी, तर भंडारी आणि पळणीकर यांना नंतर अटक झाली. तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांनी सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या अश्विनी बिद्रे यांना सात वर्षांनंतर न्याय मिळाला असून, या प्रकरणातील शिक्षा सुनावणीची सर्वांना उत्सुकता आहे.
हत्येचे कारण काय?
या हत्येचे कारण वैयक्तिक वादातून उद्भवले असावे, असे तपासातून समोर आले आहे. अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यातील संबंधांबाबत तपासात काही माहिती समोर आली होती, ज्यात त्यांच्यातील वैयक्तिक मतभेद आणि तणाव हा हत्येचा संभाव्य हेतू असू शकतो असे सूचित झाले होते. असा दावा आहे की अभय कुरुंदकर याने अश्विनी यांना त्यांच्यासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला तिने नकार दिला होता, आणि यातून उद्भवलेल्या रागातून ही हत्या घडली असावी तथापि, हत्येचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती याबाबत संपूर्ण स्पष्टता तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतून अद्याप पूर्णपणे उघड झालेली नाही. या प्रकरणात अभय कुरुंदकर याला दोषी ठरवण्यात आले असून, त्याची शिक्षा ११ एप्रिल २०२५ रोजी ठोठावली जाणार आहे.
