तळेरे (स्वप्निल तांबे ) : भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती जगभरात मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. कणकवली तालुक्यातील ओझरम मापारवाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये देखील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले. या वेळी जाकीर शेख सर यांनी मुलांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी जाकीर शेख सर, मुख्याध्यापक आरती कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका राणे मॅडम, अंगणवाडी मदतनीस स्वाती तांबे मॅडम तसेच शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे समाजक्रांतीचे तत्वज्ञान मांडणारी प्रचंड ऊर्जा शक्ती होय. ती केवळ व्यक्ती नसून आदर्श जगाच्या समाज रचनेची संकल्पना मांडणारी एक प्रगल्भ विचारशक्ती आहे. त्यांनी आपल्या अवघ्या आयुष्यात अहोरात्र जे विचार युद्ध केले ते फक्त एका जातीच्या किंवा समाज घटकांच्या उत्थानासाठी नसून, सर्वहारा मानव जातीच्या कल्याणासाठी होते. तथाकथित विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातीच्या चौकटीत न पाहता राष्ट्रनिर्मितीचे त्यांचे कार्य जगासमोर आणून सर्वव्यापी बाबासाहेब ही प्रतिमा समाज मनावर बिंबवण्याची आज गरज आहे.













