२०२२- २३ सालच्या पुरस्कारासाठी ग्राम विकास विभागाकडून करण्यात आली निवड
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समिती मधील सेवानिवृत्त वरिष्ट सहाय्यक नीलम नामदेव जाधव यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २०२२- २३ सालसाठी चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून १६ एप्रिल रोजी गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी निवडीबद्दल परिपत्रक काढण्यात आले. नीलम जाधव यांनी आपण लोकसेवक आहोत या भावनेने आपल्या शासकीय सेवाकाळात नेहमीच लोकाभिमुख कारभार केला. आपल्या शासकीय सेवाकाळात शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे शासकीय सेवेतील लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.सोपविलेले काम निःपक्षपातीपणे व दर्जेदार पद्धतीने सादर करण्यात त्यांची हातोटी होती.कार्यालयीन कामकाज संगणिकाकरणाद्वारे नवनवीन कल्पना वापरून कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.कर्मचारी व सहकारी यांच्यात कार्यसंस्कृती व कार्यनिती रुजविणे व जोपासणे यासाठी नीलम जाधव नेहमीच प्रयत्नशील असत.सामाजिक हिताच्या दृष्टीने सार्वजनिक योजना व निर्णय व्यापक प्रमाणावर राबविण्याच्या प्रक्रियेत त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग घेतला. नीलम जाधव यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०२२-२३ सालचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नीलम जाधव ह्या नियत वयोमानानुसार आपल्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत.याबद्दल नीलम जाधव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.













