कोकिसरे रेल्वे फाटकाच्या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे रेल्वे भुयारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गुरुवारी रात्री ११. ३० ते शुक्रवारी पहाटे ३. ३० या दरम्यान चार तासाचा कोकण रेल्वे मार्गावर मेघा ब्लॉक घेऊन तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पिलर व रूळ असलेला ब्रिज तयार करण्यात येणार आहे. यासाठी मोठी यंत्र सामुग्री तैनात करण्यात आली असून युद्ध पातळीवर काम करण्यात येत आहे. तर २ मे ला हा भुयारी पूल पूर्ण तयार होणार आहे. या भुयारी पुलामुळे तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकीचा मोठा अडथळा दूर होणार आहे.
तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोकिसरे येथे कोकण रेल्वेचे फाटक आहे. याठिकाणी कोकण रेल्वे कडून गेले वर्ष दीड वर्षे भुयारी पुलाचे काम चालू आहे. याठिकाणी सिमेंट काँक्रीटचे पूल रेल्वे रुळाच्या बाजूला करण्यात येत आहे.प्रथम याठिकाणी शुक्रवारी रात्री कोकण रेल्वे मार्गावर मेघा ब्लॉक घेऊन लोखंडी पिलर असलेला रेल्वे रुळासह पूल क्रेनच्या सहाय्याने बसाविण्यात येणार आहे. या कामाची पाहणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
हा तात्पुरता पूल तयार झाल्यानंतर त्या रुळाखालील माती खाणून बोगदा तयार करण्यात येईल आणि या बोगद्यात अगोदरच बाहेर तयार केलेला ब्रिज क्रेनच्या साह्याने ढकलून बसवण्यात येणार आहे. हा ब्रिज दोन लेनचा असून त्याची रुंदी ८. ५तर उंची ५. ५ मिटर आहे. त्यासाठीही मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून. हा सिमेंट काँक्रीटचा पूल फिट झाल्यानंतर तात्पुरता टाकण्यात आलेला लोखंडी पूल २४ एप्रिलला बाजूला करून भुयारी पूलावरून रूळ टाकून वाहतूक करण्यात येणार आहे. २ मे ला हा भुयारी पूल पूर्ण तयार होणार आहे. यासाठी तीनवेळा मेघा ब्लॉक घेण्यात येणार आहे.अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.मात्र याबाबत रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. याबाबत रेल्वेच्या बेलापूर मुख्य कार्यालयातून माहिती प्रसिद्ध करण्यात येईल असे सांगितले.














