चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे नुकतीच पार पडली. सर्व १३ संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व खजिनदार या पदांसाठी निवडणूक दिनांक 25/4/2025 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद गोसावी, यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. याबरोबरच उपाध्यक्ष पदी योगेश राऊळ, सचिव पदी अनंत परब, सहसचिव पदी शरद गोसावी, खजिनदार पदी जयवंत केळुस्कर आणि संचालकांच्या पदावर सीए हेमंत परब, सिताराम परब, राजन प्रभु, संतोष गुराम, कमलेश गोसावी, डाॅ. शरदचंद्र काळसेकर, उमेश प्रभु आणि शिवनंदन प्रभु या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुक प्रक्रियेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून श्री देऊ तळेकर यांनी काम पाहिले.
विनोद गोसावी हे मुंबई व ठाणे या जिल्ह्यात शासकीय सेवा करून उपजिल्हाधिकारी या पदावरून सन २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले असून, गेली अनेक वर्षे ते काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळावर संचालक म्हणून व मागील 3 वर्षे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा प्रशासकीय सेवेतील तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव हा संस्थेच्या/ प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. अध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आल्यानंतर, त्यांच्या या 5 वर्षाच्या काळात संस्थेतील सर्व विद्यमान पदाधिकारी व संचालकांना सोबत घेऊन प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत. प्रशालेच्या पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयुक्त पडणारे विविध कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण देण्यावर विशेष भर देणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले आहे.












