कणकवलीतील रोजगार मेळाव्याला तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली (प्रतिनिधी) : बेरोजगार तरुण तरुणींच्या हाताला रोजगार देण्याचा उपक्रम राबविणे ही खरोखरच स्तुत्य कल्पना आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 270 अशा विविध नोकऱ्यांची संधी तुम्हाला मिळाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहून काम करण्याची सुवर्णसंधी या मेळाव्यामध्ये उपलब्ध झाली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेज येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ना. नितेश राणे बोलत होते. यावेळी कणकवली शिक्षण प्रसारक मंडळचे चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, कणकवली कॉलेज चे प्राचार्य युवराज महालिंगे, सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, जिल्हा कौशल्य विभागाचे आमीन तडवी, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल मोहारे , प्राध्यापक हरिभाऊ भिसे, प्राध्यापक श्री माने आदी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री माझ्या संपर्कात नेहमी असतात येत्या काही महिन्यांमध्ये कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढवण बंदरामध्ये ज्या काही नोकऱ्या आहेत कौशल्य आहेत त्याचे कोर्स निर्माण करणार असल्याचे नामदार राणे यांनी सांगितले.
डॉक्टर राजश्री साळुंखे म्हणाले, स्पर्धेच्या जगामध्ये फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन उपयोग नाही तर विविध कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. या कौशल्याच्या आधारे वेगवेगळ्या संधी मिळू शकतात याची सर्वांना जाणीव असली पाहिजे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे त्यामुळे त्यांनी आपल्या अंगी असलेले कौशल्य ओळखून त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे असे डॉक्टर साळुंखे यांनी सांगितले. युवराज महालिंगे म्हणाले, स्पर्धा वाढत जाते तशी निवडीची काठी नाथा वाढत जाते. त्यामुळे डिग्री मिळाल्यानंतर लगेचच नोकरी मिळेल या भ्रमात विद्यार्थ्यांनी राहता कामा नये. मार्केटमध्ये ज्या प्रकारची मागणी आहे त्याचा अभ्यास करून आपण आपल्या कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
तरुण-तरुणींना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध नोकऱ्या उपलब्ध करून देणे हा उपक्रम कौतुकास्पद आहे. मात्र या मेळाव्याचा प्रसार व प्रचार करण्यास कौशल्य विकास विभाग कमी पडला आहे. ज्या दिवशी हा मेळावा आयोजित करण्याचे ठरले तेव्हापासून योग्य पद्धतीने प्रचार व प्रसार केला असता तर हा हॉल कमी पडला असता. त्यामुळे पुढील रोजगार मेळावा आयोजित केल्यानंतर आठवडाभर आधी या मेळाव्याचा योग्य पद्धतीने प्रचार व प्रसार करावा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या










