मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुमामे गावचे बांधकाम व्यावसायिक तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेचे कार्यकर्ते अणाजी उर्फ पपी मुणगेकर यांनी उबाठा शिवसेनेला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांमुळे व जनसंपर्काच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
शिवसेना नेते काका कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात अणाजी उर्फ पपी मुणगेकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सुकळवाड जिल्हा परिषद सदस्या सुमेदा पाताडे, मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण तालुकाप्रमुख मंदार लुडबे, कुमामे शाखाप्रमुख दयानंद चव्हाण, आमदार निलेश राणे यांचे समर्थक दादा नाईक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आगामी काळात गावपातळीवर शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
“आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे, सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद आणि कार्यकर्त्यांना दिले जाणारे बळ यामुळे मी प्रभावित झालो. जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या नेतृत्वासोबत राहून समाजासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे, या उद्देशाने मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रवेश केल्यानंतर पपी मुणगेकर यांनी सांगितले.












