विद्यार्थी घडतील सशक्त भारताचे आदर्श नागरिक – दिलीप पाटील
वैभववाडी (प्रतिनिधी) : आजच्या तरुण पिढीला शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती, परंपरा, संस्कार आणि नीतिमूल्ये यांचेही बालवयापासून संस्कार होणे आवश्यक आहे. नावळे गावात आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून या सर्वांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच हे गुण अंगीकारल्यास ते सशक्त भारताचे आदर्श नागरिक बनतील, यात शंका नाही, असे प्रतिपादन वैभववाडी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.
आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद विद्यामंदिर, नावळे धनगरवाडा ते भगवती मंदिर अशी भव्य बालदिंडी अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. अभंग, हरिपाठ, फुगडी, पारंपरिक खेळ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवले.
यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील, सेवानिवृत्त बँक अधिकारी राजेंद्र रावराणे, सरपंच स्नेहल गुरव, मुख्याध्यापक श्री. भरडकर, श्री. माने, आत्माराम गुरव, रमेश गुरव, महेश रावराणे, मोहन पडवळ, संजय शेळके, संजय पाटील तसेच पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते.”ज्ञान, संस्कार आणि भक्तीचा संगम असलेला हा बालदिंडी सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांचे बीज रुजवणारा ठरला.”
यावेळी नायब तहसीलदार दिलीप पाटील आणि महेश रावराणे यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद विद्यामंदिर, धनगरवाडा या शाळेला डेल कंपनीचे दोन लॅपटॉप प्रदान करण्यात आले.याबद्दल शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.











