इनरव्हील क्लब वेंगुर्लाचा गौरव पेडणेकर यांच्या उपचारासाठी मदतीचा हात

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : किडनीच्या गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या आरवली येथील गौरव सुभाष पेडणेकर यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी इनरव्हील क्लब, वेंगुर्ला यांच्या वतीने ₹१५,००० ची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा ज्योती देसाई, उपाध्यक्षा सई चव्हाण, खजिनदार सौ. वृंदा गवंडळकर, सदस्य आकांक्षा परब, रसिका मठकर व डॉ. पूजा कर्पे यांनी पेडणेकर कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीची रक्कम सुपूर्द केली. यावेळी त्यांनी गौरव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,आरवलीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तातोबा कुडव, आसोली शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर, श्रेया पेडणेकर, वृषाली पेडणेकर, विशाल पेडणेकर,सुहासिनी पेडणेकर तसेच सुभाष पेडणेकर उपस्थित होते.

इनरव्हील क्लब वेंगुर्लाने सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णाला दिलेला हा मदतीचा हात निश्चितच दिलासादायक असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. तसेच अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
दरम्यान, गौरव सुभाष पेडणेकर यांच्यावर लवकरच मुंबई येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी तसेच पुढील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि समाजबांधवांनी आपल्या परीने आर्थिक मदतीचा हात पुढे करून पेडणेकर कुटुंबाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

error: Content is protected !!