आत्मा, मन व बुद्धीचा सुंदर मिलाप म्हणजे योगासन होय – डाॅ. तुळशीराम रावराणे

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला ओरोस येथील जिजामाता हाॅस्पिटल हालमध्ये धुमधडाक्यात प्रारंभ

तळेरे (प्रतिनिधी) : आत्मा, मन व बुद्धी यांनीच आपल्या शरीराचा सुंदर मिलाप होतो व शरीर तंदुरुस्त बनते. शरीर तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. ते तंदुरुस्त ठेवायचे असेल तर योगासनाशिवाय पर्याय नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा समजल्या जाणाऱ्या योगा प्राणायामाने, आज संपूर्ण विश्व व्याप्त केले आहे. या विश्वामध्ये आपलाही टिकाव लागायचा असेल तर शालेय जीवनापासूनच मुलांना योगासनाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या या सहाव्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा होय, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव डॉक्टर तुळशीराम रावराणे यांनी ओरोस येथील जिजामाता हाॅस्पिटल हॉलमध्ये जिल्हास्तरीय योगासन निवड स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण मालंडकर (अध्यक्ष रोटरी क्लब सेंट्रल ), कार्यक्रमाच्या व संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा मोरे, संघटनेचे सेक्रेटरी डॉक्टर तुळशीराम रावराणे, उपाध्यक्ष रावजी परब, कार्यक्रमाचे समन्वयक प्रकाश कोचरेकर, राष्ट्रीय योगासन पंच संजय भोसले, श्वेता गावडे, ऍड. वर्षा गावकर, ऍड. विवेक राणे, किसन ठोंबरे, आनंद सावंत, नीता सावंत, आनंद परब, डॉक्टर वृषाली सावंत, निकिता लाड, तेजल कुडतरकर ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य व संपूर्ण स्टाफ हजर होता.

या स्पर्धा दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील योगा खेळाडूंना ही पर्वणी ठरलेली आहे. यातूनच राज्यस्तरावर खेळाडूंची निवड होणार असून वयोगटानुसार या स्पर्धा पार पाडल्या जाणार आहेत. सदर स्पर्धेसाठी जिल्हाभरातून विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद लाभलेला आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक राणे यांनी केले तर श्वेता गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी स्पर्धकांशिवाय त्यांच्या पालकांची उपस्तिथी लक्षणीय होती.

error: Content is protected !!