मित्रपक्ष शिवसेनेकडून भाजपाला कमी लेखण्याच्या प्रकाराने भाजपा कार्यकर्त्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
जिल्हा परिषद, पं. स निवडणुकीत भाजपा शिवसेना मैत्रीपूर्ण लढतीसाठी भाजपा कार्यकर्ते आग्रही
कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीत भाजपा नेत्यांवर स्वबळावर लढण्यासाठी दबाव
सिंधुदुर्गचे पालकमंत्री, तथा रत्नागिरी चे संपर्कमंत्री नितेश राणेंचे सूचक वक्तव्य
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेकडून विकासनिधीत सापत्नपणाची वागणूक मिळते. मित्रपक्ष शिवसेनेचे नेते भाजपाला कमी लेखतात, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून शिवसेनेसोबत लढण्याऐवजी स्वबळावर शिवसेनेविरुद्ध लढावी असा भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आमच्यावर दबाव आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत, या निकषावर सिंधुदुर्गात 60 टक्के शिवसेनेचे प्राबल्य असल्याचे शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षमेळाव्यात जाहीर दावा करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपापेक्षा शिवसेनेला आगामी निवडणुकीत जागा वाटपात झुकते माप मिळावे असे शिवसेनेचे नेते म्हणतात. शिवसेनेकडून भाजपला तळकोकणात कमी लेखण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे येत्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुक स्वबळावर लढून एकदाच काय ते दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे अशी भाजपा कार्यकर्त्यांची भावना आहे.त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून शिवसेनेसोबत लढण्याऐवजी स्वबळावर लढावी अशी मागणी आहे.येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती म्हणून नव्हे तर भाजपाने स्वबळावर लढावी यासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आमच्याकडे आग्रही मागणी आहे असे सिंधुदुर्ग चे पालकमंत्री आणि रत्नागिरी चे भाजपा संपर्कमंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंत्री नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा आणि शिवसेना हे मित्रपक्ष आगामी निवडणूकित आमने सामने येण्याची चिन्हे दिसत आहेत. ओरोस येथे पत्रकारांनी पुढे विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले की रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा एकही सदस्य नाही. त्यामुळे स्वबळ आजमावणे आणि पक्ष संघटनेसाठी जीवतोड मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा विचार करावा लागेल. त्यातून भाजपा नेमकी कुठे आहे हे समजेल. लोकसभा निवडणूकीतही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे महायुती चे विजयी उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, रत्नागिरी आणि चिपळूण या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून अजिबात लीड मिळाले नाही. हेही लक्षात घ्यायला हवे. लांजा, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 20 कोटींचा निधी स्थानिक आमदारांना मिळतो. पण त्यातील किती वाटा भाजपा कार्यकर्त्यांच्या विकासकामाला मिळतो ? त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक मित्रपक्ष शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढण्याऐवजी स्वबळावर लढावी. शिवसेनेसोबत मैत्रीपूर्ण लढत द्यावी असा आग्रह भाजपा कार्यकर्त्यांचा असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले. सिंधुदुर्ग चे पालकमंत्री आणि भाजपाचे रत्नागिरी चे संपर्कमंत्री असलेल्या नामदार नितेश राणे यांच्या या वक्तव्याने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत भाजपा आणि शिवसेना हे मित्रपक्ष आमने सामने ठाकण्याची जोरदार शक्यता निर्माण झाली आहे.












