आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास अधिकाऱ्यांना काळं फासणार – संजू परब

परपोली गावातील खड्डेमय रस्त्यांवरून संताप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्यात फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडी तालुक्यातील परपोली हे महत्त्वाचे पर्यटन गाव असले तरी सध्या ते रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे चर्चेत आले आहे. गावातील प्रमुख रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले असून, स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. निधी उपलब्ध असूनही रस्त्यांच्या दुरुस्तीकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे संतप्त ग्रामस्थांच्या संयमाचा बांध फुटला असून, “आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू,” असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते संजू परब यांनी दिला.

ग्रामपंचायत सदस्या ऋतुजा परब आणि उपसरपंच संदेश गुरव यांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. “केसेस जरी दाखल झाल्या तरी चालतील, पण आता सहनशीलतेचा अंत झाला आहे,” असे ठाम मत संजू परब यांनी व्यक्त केले.

परपोली हे परदेशी पर्यटकांचे आकर्षण केंद्र असले तरी गावाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांची दुरवस्था पर्यटनालाही मारक ठरत आहे. त्यामुळे रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.

error: Content is protected !!