अद्ययावत ई-टॉयलेट्समुळे कणकवलीत समस्या झाली दूर
कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि कणकवली नगरपंचायतीने उभारलेल्या अद्ययावत अशा कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील या ई-टॉयलेट्सचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक किशोर राणे, संजय कामतेकर, नगरपंचायतीचे कर्मचारी अमोल अघम, अमोल भोगले, प्रशांत राणे, सचिन नेरकर, विभव करंदीकर, रवी महाडेश्वर, ध्वजा उचले, संदीप मुसळे, सोनाली खैरे, ज्योती देऊलकर, उद्योजक मंदार सापळे, अॅड. दीपक अंधारी, प्रद्युम मुंज आदी उपस्थित होते.
ही टॉयलेट्स उभारणीसाठी जिल्हा नियोजनाच्या नावीन्यपूर्ण निधीतून कणकवली नगरपंचातीला निधी उपलब्ध झाला होता. हा निधी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला होता. या निधीतून ही ई-टॉयलेट्स उभारली आहेत. स्वच्छ आणि तंत्रज्ञानावर आधारित ही टॉयलेट्स आहेत. पे अॅण्ड यूजच्या धर्तीवर त्याचा वापर केला जातो. नाणे टाकल्यानंतर स्वच्छतागृहाचा वापर करता येईल. यात अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. २ रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडे होते. यात वॉश बेसीन आहे. या ई-टॉयलेटमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. उड्डाणपुलाखाली तीन ई-टॉयलेट्स उभारली आहेत. बसस्थानकसमोरील उड्डाणपुलाखाली उभारलेले ई-टॉयलेट्स केवळ महिलांसाठी उभारले आहे.
कणकवली शहरात नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणार : गौरी पाटील
कणकवली शहरात नेहमीच वर्दळ असते. स्वच्छतागृहाअभावी स्त्रियांसह नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता नगरपंचायतीच्या माध्यमातून व पालकमंत्री यांच्या सहकार्यातून शहरातील उड्डाणपुलाखाली तीन टॉयलेट्स उभारण्यात आली आहेत. ही टॉयलेट्स सर्व सोयीसुविधायुक्त स्वयंचलित व स्थलांतरित करता येणारी टॉयलेट्स आहेत. ही टॉयलेट्स सेल्फ किलिंग आॅटोमोटेड टॉयलेट्स आहेत. कणकवली नगरपंचायतीने जुने भाजी मार्केट येथे अद्ययावत स्वच्छतागृह उभारले आहेत. हे स्वच्छता २४ तास सुरू ठेवण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून ई-टॉयलेट्स राबविण्यात आली आहे. शहरात यापुढील काळात नागरिकांच्या न. पं. च्या माध्यमातून नवनव्या संकल्पना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली.












