महावितरणच्या विरण येथील उपकेंद्राला भेट
चौके (प्रतिनिधी) : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट च्या मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन विषयाच्या इयत्ता दहावीच्या ऊर्जा पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी विरण येथील महावितरणच्या उपकेंद्राला भेट दिली. विद्यार्थ्यांना उप केंद्रामध्ये विजेचे वितरण कसे केले जाते तसेच कोणत्या सुरक्षा पाळल्या जातात याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पी. एन. मारबते यांनी प्रशालेच्या मुख्याध्यापकांचे स्वागत केले तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत केले . मारबते यांनी विद्यार्थ्यांना वीज निर्मितीचे प्रकार,वीज निर्मिती कशी होते, वीज निर्मिती केंद्रामधून वीज मेगा वॅट मध्ये कशी मोजली जाते ,स्टेप अप करून कशी वाढविली जाते, त्यानंतर उपकेंद्रात येईपर्यंत स्टेप डाऊन व उप केंद्रामधून वितरण कसं केलं जातं याची सखोल माहिती दिली. तसेच उपकेंद्रामध्ये वापरण्यात येणारे इन्सुलेटर त्यांचे प्रकार त्यांचे फायदे तसेच विविध सर्किट ब्रेकर त्यांचे फायदे तसेच सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणारी साधने ,उपाययोजना, उप केंद्र परिसरातील अर्थिंग त्याचे महत्व त्याचप्रमाणे हाय व्होल्टेज मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिटर त्यासाठी वेगळी केलेली लाईन त्यानंतर आपल्या घरापर्यंत येणारी लाईन त्याचे स्टेप डाऊन होल्टेज याचीही सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचप्रमाणे वीज पडू नये यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा तर वीज पडून किंवा इतर बाबीमुळे होणारा बिघाड त्यासाठी योग्य उपाय योजना विजेच्या खांबांना धक्का बसू नये यासाठी वापरण्यात येणारी सुरक्षितता तसेच लाईनवर काम करत असताना घेण्यात येणारी सुरक्षितता आणि दूर दूर नेलेल्या लाईन त्यांना योग्य होल्टेज मिळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन केले. विद्यार्थांची शिस्त आणि इलेक्ट्रिकल विषयाची असलेली आवड , समजून घेण्याचा स्वभाव पाहून विद्यार्थांचे कौतुक केले. शालेय जीवनातच असे विषय शिकवून विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे तसेच त्यांच्या कौशल्याला चालना देण्याचे काम हि शाळा आणि निदेशक करीत असल्याने भविष्यात हे विद्यार्थी खूप मोठ्या हुद्द्यावर किंवा उद्योजक बनतील यात शंकाच नाही असे बोलून अशा प्रकारची उप केंद्रासारख्या ठिकाणी क्षेत्रभेट काढून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्याची हि संकल्पना MSAT विभागाची नावीन्यपूर्ण असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. एच. कुबल, MSAT विषयाचे ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले, अभियांत्रिकी विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे, शेती पशु पालन विभागाचे निदेशक रोशन माळकर, गृह आरोग्य विभागाच्या निदेशिका हर्षदा पाटकर उपस्थित होत्या. यावेळी प्रशालेच्या वतीने मारबते यांनी आपला किमती वेळ देऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले व उत्तम माहिती दिली याबद्दल त्यांचे आभार ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले यांनी मानले.












