वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा बाजारपेठेतील प्रसाद धर्मराज सूर्यवंशी यांच्या धर्मराज बेकरीला आग लागून त्यांचे सुमारे ३ लाख रुपयांपेक्षा मोठे नुकसान झाले आहे. शॉक सर्किट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. भुईबावडा बाजारपेठेत प्रसाद सूर्यवंशी यांची घराशेजारीच बेकरी आहे. नेहमीप्रमाणे रात्री बेकरी बंद करून ते बाजूलाच असलेल्या घरी झोपण्यासाठी गेले. मध्य रात्री त्यांच्या घरात धुराचे लोट आले. या धुराने घुसुमटल्यामुळे सूर्यवंशी कुटुंबाला जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बेकरीतून धूर व आगीचे लोट येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक मदतीला धावले. प्रथम वीजपुरवठा खंडित करून ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत या आगीत बेकरीतील फ्रीझ, फर्निचर, यासह बेकरीतील इतर सर्व साहित्य व वस्तू तसेच विदु्यत उपकरणे आगीत जळून खाक झाली.
ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा ती त्याला लागून असलेल्या त्यांच्या भावाच्या दुकानाकडे तसेच या दुकानाला लागून असलेल्या घराकडे गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीची माहिती मिळताच गावचे सरपंच बाजीराव मोरे, तलाठी दीपक म्हस्के, पोलीस पाटील मनोज चव्हाण, ग्रामसेवक घनश्याम नावळे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
भुईबावडा परिसरात कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे अनेक वेळा वीज उपकरणे जळली जात असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शॉट सर्किट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.












