वैभववाडी (प्रतिनिधी) : लेखक,कवी सुनील कांबळे यांच्या ‘शिलालेख’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कवी लेखक व लोककला साहित्याचे अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांच्या हस्ते करण्यात आले. सम्यक साहित्य संसद आयोजित कणकवली येथे संपन्न झालेल्या ‘कविता वर्षावासाच्या, कविता परिवर्तनाच्या’ या अभिनव कार्यक्रमात, हेतकर्स पब्लिकेशन प्रकाशित कवी कांबळे यांच्या ‘शिलालेख’ या दुसर्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
सुनील कांबळे हे वैभववाडी तालुक्यातील हेत गावचे सुपुत्र असून हेतकर आडनावाने गद्यलेखन करीत असतात. त्यांची आजवर विविध विषयांवरील नऊ पुस्तकें प्रकाशित झाली असून त्यामध्ये ‘टेळका’ हा त्याचा पहिला काव्यसंग्रह लोकाभिमुख झाला. २०१७ मध्ये सुगावा प्रकाशित ‘थेरीगाथा: स्त्रीमुक्ती, समाज आणि तत्त्वज्ञान’ या संशोधन व वैचारिक पुस्तकामुळे त्यांचे नाव महाराष्ट्रभर पोहोचले. ‘डाॅ.बाबासाहेब अांबेडकर यांचा बुद्ध धम्मविषयक दृष्टिकोन व २२ प्रतिज्ञा’ (वैचारिक) ‘परिव्रजा’ (दीर्घकथा) ही त्यांची विशेष पुस्तकें प्रकाशित आहेत. हेतकर्स पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या ‘इस्तव या कथासंग्रहाच्या दोन आवृत्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याशिवाय त्यांनी संपादिक केलेली पुस्तकेंही चर्चेत आहेत. ते कवी, लेखक असण्याबरोबरच ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे ते विद्यमान सरचिटणीस असून त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंत तीन यशस्वी संगीती पार पडल्या आहेत.
शिलालेख प्रकाशन कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम, अपरान्त संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे, सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव व प्रसिद्ध निवेदक राजेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदेश तांबे व निलेश पवार यांनी केले तर आभार प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी मानले.












