इरप्पा चिन्चिणी या वयोवृद्ध बांधवांचे बेळगाव जवळील निडसोसी मठ वाडीत केले कुटुंब पुनर्मिलन
खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था आणि अहिल्यानगरच्या स्नेहालय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दि .१८ जुन २०२५ रोजी कणकवलीतील फोंडाघाट येथे समाजातील निराधार वंचितासाठी स्नेहसिन्धु आश्रम सुरू करण्यात आला.या स्नेहसिन्धु आश्रमातील सुवर्णा रावराणे,आशिष कांबळी आणि तळेकर यांनी नुकतेच आश्रमातील इरप्पा चिन्चिणी (वयः ६०वर्षे) या बांधवांचे बेळगाव (कर्नाटक) जवळील निडसोसी मठाजवळ इरप्पा यांच्या भाच्याच्या ताब्यात देवून कुटुंब पुनर्मिलन घडवून आणले.
याबाबत अधिक वृत्त असे की, कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावचे पोलीस पाटील दिलीप वराडकर,सरपंच – रावजी कदम, सचिन परब व इतर ग्रामस्थांनी एका अनोळखी इसमास सरंबळ परबवाडी येथे रात्री ९.३० वाजता बेवारस स्थितीत पाहिले असता त्यांनी ११२ नंबर वर कॅल करून कुडाळ पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी सदर अनोळखी व्यक्ती म्हणजेच इरप्पा चिन्चिणी या कन्नड भाषिक वयोवृद्ध व्यक्तीस दि.२९/४/२०२५ रोजी आश्रय आणि सुरक्षिततेसाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले होते.
जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून कणकवली फोंडाघाट येथे नवीन आश्रम सुरू झाल्यानंतर इरप्पा यांना फोंडाघाट येथे ठेवण्यात आले. यावेळी आश्रम वास्तव्यात इरप्पा यांनी त्यांच्या गावी निडसोसी मठाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.आश्रमातील स्वयंसेवी कार्यकर्त्या सुवर्णा यांनी आश्रमाचे कार्यकर्ते अनिल चिरमुरे यांच्या सहाय्याने इरप्पाशी संवाद साधला…त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बेळगाव येथील निडसोसी मठाजवळ असल्याचे निश्चित झाल्यानंतर स्नेहसिन्धु आश्रमाचे कार्यकर्ते आशिष कांबळी, सुवर्णा रावराणे आणि साई तळेकर यांनी इरप्पा यांना त्यांचे निडसोसी मठ येथील गावी प्रत्यक्ष जावून त्यांच्या भाच्याच्या ताब्यात दिले.
स्नेहसिन्धु आश्रमाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे एका वयोवृद्ध आजोबांना आपली माणसं मिळाली. जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब व विश्वस्त मंडळाने सर्व सेवाकार्यकर्त्यान्चे अभिनंदन केले.















