वाढत्या चोऱ्यांवर लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क
कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा महामार्गावर गडनदी पुलाजवळ पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू असून, चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी सुरू आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळी, महिला पोलीस प्रणाली जाधव, वाहतूक पोलीस दिलीप पाटील, कॉन्स्टेबल दिग्विजय काशीद व हवालदार दीपक चव्हाण सहभागी आहेत.
तपासणी दरम्यान विनापरवाना वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट्स, अपूर्ण कागदपत्रे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, ट्रिपल सीट यांसारख्या नियमभंगांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांचे धाबे दणाणले असून, काहींची वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

मात्र, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून या तपासणीच्या ठिकाणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. गडनदी पुलाजवळ महामार्गावर वेगाने जाणाऱ्या वाहनांना अचानक थांबवण्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचं वाहनचालकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात आधीच ओसरगाव, खारेपाटण, फोंडा आणि वैभववाडी येथे तपासणी नाके असताना अशा उतार भागावर तपासणी केल्याने सुरक्षा धोक्यात येत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.












