सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्यामार्फत मोफत हॉल उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट राधाकृष्ण मंगल कार्यालयात नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागामार्फत मोफत कॅन्सर व इतर आजारांसाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात आशा व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी आणि भावेश कराळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला.

कार्यक्रमाची सुरुवात फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांच्या हस्ते नारळ फोडून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. माजी पंचायत समिती सभापती श्रीमती हळदिवे, ग्रामपंचायत सदस्य पिंटू पटेल, पवन भोगले, डॉ. यादव (वैद्यकीय अधिकारी, फोंडाघाट), वैभववाडी वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, अॅम्बुलन्स चालक अजित सापळे व जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीमती काळगे यांनी सरपंच, माजी सभापती श्रीमती हळदिवे, ग्रामपंचायत सदस्य व सर्व डॉक्टरांचा सत्कार केला. श्रीमती काळगे या फोंडाघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. काळगे यांच्या पत्नी असल्याने त्यांचाही सरपंच संजना आग्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. काळगे यांनी त्यांचे आभार मानले. अजित नाडकर्णी यांनी समाजकार्यासाठी सदैव हॉल उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी माजी सभापती श्रीमती हळदिवे यांनी आभार प्रदर्शन केले आणि तत्काळ तपासणी व टेस्टिंग कार्य सुरू करण्यात आले. या उपक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.












