हुतात्मा कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरात 118 रक्तदात्यांचे रक्तदान…
वैभववाडी (प्रतिनिधी) : युवकांनी सैन्य दलाकडे वळले पाहिजे. देशाला तुमची गरज आहे.कौस्तुभचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. सैन्य दलात जाणारांची संख्या वाढली पाहिजे. वैभववाडी तालुका हा जवानांचा तालुका अशी ओळख निर्माण झाली पाहिजे. अशी अपेक्षा कौस्तुभ रावराणे यांच्या विरमाता ज्योती रावराणे यांनी व्यक्त केली. मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महारक्तदान शिबिर येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पार पडले. या रक्तदान शिबिरात एकूण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी विजय रावराणे, सज्जन काका रावराणे, प्राचार्य नामदेव गवळी, प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, संजय रावराणे, गिरीधर रावराणे, नासीर काझी, नागरीक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सेना मेडल कौस्तुभ रावराणे यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल मानवंदना देण्यात आली. यावेळी ज्योती राणे म्हणाल्या, हातात बंदूक घेऊन देशसेवा करण्याचे सदभाग्य प्रत्येकाला प्राप्त होत नाही. पण खचून जाऊ नये. रक्तदान हे देखील एक सेवाच आहे. आपण देशासाठीच रक्तदान करतो.कौस्तुभनंतर कौस्तुभची पत्नी, माझी सून सैन्य दलात कॅप्टन म्हणून काम करत आहे. माझा नातू देखील आर्मीच्या वातावरणात मोठा होत आहे. आर्मी बद्दल त्याचं देखील चांगलं मत व्हावं म्हणूनच तो आपल्या आई सोबत आहे. आज बऱ्याच तरुणांना सैन्य दलात जायचे आहे. परंतु त्यांची आई सैन्य दलात जाऊ देत नाही. परंतु महान कार्य करण्यापासून आपण आपल्या मुलाला वंचित ठेवत आहोत. पालकांनी मुलांच्या पाठीशी खंबीर राहिले पाहिजे. मुलांनी देखील क्षमता, कुवत ओळखून काम केले पाहिजे. सैन्य दलाकडे वळले पाहिजे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कौस्तुभ रावराणे यांना मानवंदना दिली. स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे कौस्तुभ ची आई ज्योती रावराणे, मामा व मामी यांनी कौतुक केले.












