कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीचे शिक्षण नेहमीच देत असते. याचाच एक भाग म्हणून श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून समाजासाठी काम करणाऱ्या समाज बांधवांचा राखी बांधून अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या दिनाच्या निमित्ताने सण उत्सव असो किंवा वारा पाऊस प्रवाशांसाठी अविरत सेवा देणाऱ्या राज्य परिवहन मंडळाचे चालक वाहक यांचा प्रशाळेतील स्काऊट गाईड विभाच्या विद्यार्थ्यांनी राखी बांधून सन्मान केला. तसेच स्वच्छ भारत सुंदर भारत या शासनाच्या उपक्रमात खारीचा वाटा उचलणारे सफाई कामगार, जनतेच्या सेवेसाठी व सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस बांधव, रात्रंदिवस कार्यरत असणारे महावितरण चे कर्मचारी बांधव आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तसेच मुलांना सांभाळून शालेत ने आण करणारे शाळेचे बस चालक व सुरक्षा रक्षक, शिपाई यांच्या कामाचा कृतज्ञतापूर्वक राखी बांधून सन्मान करण्यात आला.
संपूर्ण उपक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम डांगे, स्काऊट गाईड प्रशिक्षक श्रीकांत सुतार यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे देखील मार्गदर्शन लाभले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल अध्यक्ष मनोज गुळेकर व सर्व संस्था पदाधिकारी, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
















