चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा गुरामनगरी येथील काराणेवाडी निसर्ग निवास या बंगलो प्रोजेक्ट मधील आठ बंद बंगले कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अज्ञात चोरट्याकडून चोरीच्या उद्देशाने फोडण्यात आले. यामध्ये एका बंगल्या मधून अंदाजे रोख रक्कम रुपये सुमारे 30000 व एक ग्रॅम सोन्याचे नाणे असा ऐवज लंपास करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर इतर सात बंगल्यांची कुलपे फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त करण्यात आले परंतु या बंगल्यांमधून कोणत्याही मौल्यवान वस्तू रोख रक्कम अथवा अन्य वस्तूंची चोरी झाली नसल्याचे निदर्शनास आले. रोख रक्कम चोरण्यात आली असलेल्या बंगल्याचे नाव आई असे असून या बंगल्याच्या मालकाचे नाव ऋषिकेश सुभाष गिरकर राहणार मुंबई असे आहे. तर अन्य सात बंगले तारी, कन्याळकर, दळवी, फाटक, मोरे, सावंत, पवार या मालकांचे आहेत. सर्व बंगल्याचे मालक बाहेरगावी वास्तव्यास राहत असल्याने सर्व बंगले बंद असतात सुट्टीच्या कालावधीत तर काही बंगल्यांमध्ये सणासुदीच्या कालावधी घर मालक राहण्यासाठी येत असतात. रोख रक्कम चोरी झालेल्या बंगल्या मधील सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्याकडून फोडण्यात आला तर परंतु इतर सात बंगल्यांमधील काही बंगल्यांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये संबंधित संशयी चोरटा कैद झाला असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन या अज्ञात चोर त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या तपासात मदतकार्य करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस फॉरेन्सिक टीम सिंधुदुर्ग व श्वान पथक सिंधुदुर्ग हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास मालवण पोलीस करीत आहेत.
परप्रांतीय कामगार संशयित म्हणून ताब्यात
निसर्ग निवास या बंगलो प्रोजेक्टमध्ये अन्य काही नवीन बंगल्याची कामे सुरू आहेत या कामासाठी काही परप्रांतीय कामगार त्या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्यामार्फत या बंगल्यांचे काम सुरू आहे या कामगारांपैकी चोरीची घटना ज्यावेळी घडली त्यावेळी एका परप्रांतीय कामगारास त्या ठिकाणी संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे तसेच सीसीटीव्ही फुटेज मार्फत त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.












