सामाजिक बांधिलकी जपत खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थिनींनी केले रक्षाबंधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म. विद्यालय, खारेपाटण नेहमीच सामाजिक बांधिलकीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत असते. याचाच एक भाग म्हणून श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून समाजासाठी अविरत काम करणाऱ्या समाज बांधवांचा राखी बांधून अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा उपक्रम खारेपाटण हायस्कूल मधील मुलींमार्फत राबवण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने वर्षभर प्रवाशांसाठी अविरत सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे नियंत्रक, चालक,वाहक यांचा प्रशालेतील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थिनींनी राखी बंधन सन्मान केला. तसेच जनतेच्या सेवेसाठी, सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस बांधव आणि रिक्षा चालक यांच्या कामाचा नुकताच कृतज्ञतापूर्वक राखी बांधून सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रशालेतील श्रीम. अमृते, श्रीम. भोर, श्रीम. कोकाटे व प्रशालेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. हायस्कूल मधील विद्यार्थिनींच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत शिक्षक वृंद यांजकडून कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!