ब्रेकनंतर पुन्हा घुमणार फोंडाघाटच्या मैदानावर कबड्डीचा हुंकार

आझाद स्पोर्ट क्लब, फोंडाघाटकडून कणकवली तालुका शालेय कबड्डी स्पर्धेचे १७ ऑगस्ट रोजी आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना मैदान मिळावे आणि कबड्डी खेळाचा विकास होऊन, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. याकरिता काही वर्षानंतर आझाद स्पोर्ट क्लब, फोंडाघाटच्या वतीने कणकवली तालुका शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाटच्या मैदानावर (१७ वर्षाखाली व ५५ किलो वजनी गटांमध्ये) रविवार तारीख १७ ऑगस्ट २५ रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत तालुक्यातील शाळांनी आपल्या शाळेचा संघ पाठवून सहकार्य करावे व स्पर्धा यशस्वी कराव्यात, असे आवाहन अध्यक्ष प्रसाद तथा भाई नराम व सचिव दीपक इसवलकर यांनी मंडळाचे वतीने केले आहे. या स्पर्धेच्या विजेत्याला रुपये चार हजार व उपविजेत्याला रुपये तीन हजार, तसेच उपांत्य फेरीतील पराभूत संघाला रोख बक्षीस आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी शाळांनी वेळीच आपला सहभाग दीपक इस्वलकर – ९७६४०३६३८१ कडे नोंद करावा.

कबड्डी आणि फोंडाघाट मधील रसिक यांचे नाते सर्वश्रुत आहे. सह्याद्री तरुण मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या कबड्डी स्पर्धा, ओम शिवशाही मित्र मंडळाच्या अथक प्रयत्नातून राज्यस्तरापर्यंत गेल्या आणि त्यातून प्रो कबड्डी स्पर्धेतून निर्माण झालेल्या खेळाडूंनी फोंडाघाट आणि कबड्डीच्या नावाला नवा आयाम मिळवून दिला. या प्रवासात खेळाडूंसह स्वर्गीय सुदन बांदिवडेकर, प्रशिक्षक विजयसिंह पोफळे सरांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर थांबलेली ही स्पर्धा आझाद ज्युदो फोंडाघाट असोसिएशनच्या सहकार्याने पुन्हा एकदा सुरू केली आहे. पुन्हा एकदा कबड्डीचा आवाज मैदानावर घुमणार आहे. त्यामुळे कबड्डी प्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!