कणकवलीत ‘कवी कट्टा’वर काव्यरसाची मेजवानी

कोमसापच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

कणकवली (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद, कणकवली शाखेतर्फे आयोजित ‘कवी कट्टा’ कार्यक्रमात स्थानिक तसेच जिल्ह्यातील कवींनी विविध भावस्पर्शी, विनोदी, सामाजिक आणि बालकविता सादर करून रसिकांना काव्यरसाची मेजवानी दिली. शाखाध्यक्ष माधव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक व सुप्रसिद्ध मालवणी कवी रुजारियो पिंटो उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाचच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या कवी कट्ट्यात बालकवींपासून ज्येष्ठ कवींपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी कणकवलीचे माजी सभापती सुरेश सावंत, सचिव निलेश ठाकूर, खजिनदार सिद्धेश खटावकर, राजन भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

रुजारियो पिंटो यांच्या मालवणी कवितांनी हास्यलहरी उसळवल्या, तर सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्रींच्या ‘सलाम’ कवितेने सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले. कसाल येथील उद्योजक संतोष कदम यांनीसुद्धा कविता सादर केली. कवयित्री कल्पना मलये यांनी आपल्या आगामी काव्यसंग्रहातील कविता सादर केली. पत्रकार गणेश जेठे यांनी ‘मला कळत नाही’ या मथळ्याखालील कवितेचे सादरीकरण केले. सत्यवान साटम यांनी ‘जगणंच असह्य झालं असतं’ ही कविता सादर करून स्त्रीच्या नात्याचे महत्त्व सांगितलं. कवी रामचंद्र शिरोडकर यांनी मालवणी कविता गायली. निशिगंधा गावकर यांनी ‘सावली’ तर मालिनी लाड हिने ‘अंतरीची वेदना’ ही कविता सादर केली. रीमा भोसले यांनी ‘अवकाळी सर’ ही लावणी तर मालवणच्या कवयित्री ऋतुजा केळकर यांनी ‘आठवणीतला पाऊस’ या कवितेचे सादरीकरण केले. अंगुलीमान पवार यांनी ‘माझी माय मराठी’, श्रेयश शिंदे यांनी ‘रुटीन’ आणि काशिनाथ वर्देकर यांनी ‘तुला व्हायचे आहे’ ही कविता सादर केली. काव्य संमेलनाला बालकवींचीही उपस्थिती होती. उमश्री दळवी आणि सोहम यादव यांनी पाऊस या विषयावरील कविता सादर केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन आणि निलेश ठाकूर यांनी केले. कवयित्री कल्पना मलये यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

error: Content is protected !!