राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधनचे 100 प्रस्ताव मंजूर

समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मिळाली मान्यता

जिल्ह्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे मानधन – संतोष कानडे

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन समितीची बैठक आज समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ओरोस येथे संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील 100 वृद्ध कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या वृद्ध कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन मिळणार आहे. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आणखी 100 वृद्ध कलाकारांना न्याय मिळाला असून त्यांना हक्काचे मानधन दरमहा मिळणार असल्याची प्रतिक्रिया समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य संतोष कानडे यांनी दिली.

राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार समितीच्या आज ओरोस येथे संपन्न झालेल्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा. पं.) जयप्रकाश परब, समिती सदस्य संतोष कानडे, रितेश सुतार, विष्णू सुतार, अजिंक्य पाताडे, संदीप नाईकधुरे, मयूर ठाकूर, विजय सावंत, भालचंद्र केळुसकर, महेंद्र गवळी, राघोजी सावंत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्राप्त प्रस्तावांमधून सर्वसमावेशक वृद्ध कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजूर केले. भजनी बुवा, पखवाजवादक, दशावतार, फुगडी कलाकार, अपंग व महिला कलाकार आदी 100 कलाकारांचे मानधन प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

error: Content is protected !!